पप्पा झाले कोयता

पप्पा कोयता झाले...
अलोक पवार 


मराठवाड्यातील आमचा बीड जिल्हा. बीड जिल्हा का माहिती पण महाराष्ट्रातील बाकीच्या जिल्ह्याच्या तुलनेने का काय थोडासा शापितच वाटतो. मी अगदीच शेतकरी कुटुंबातला. पण बीडची जी परिस्थिती आहे तिचा अनुभव पप्पांनी जसा घेतला आहे तसा माझ्या वाटेला येऊ नये म्हणून लहानपणी माझी रवानगी नगरला झाली. पाण्यासाठी नेहमीच दारिद्री राहिलेल्या बीडशी माझे शैक्षणिक, सामाजिक आणि अगदीच माझ्या घरच्यांची नाती दूर झाली. कधी पाऊस नाही कधी शेत असून पिक नाही तर पोटच्या लेकाला पण तेच भोग नशिबी यायला नको म्हणून मी नगरच्या माझ्या आत्याकडे राहायला आलो होतो. अगदी पाचवीपासून माझा सांभाळ तिनेच केला. मला अगदीच देवकी आणि यशोदा अशा दोन मातोश्री लाभल्या होत्या म्हणायला हरकत नाही. पण लीला दाखवायला माझे गाव माझ्यापासून तुटले होते. 
मी पाचवीत असताना मला मोठे झाल्याचे भान नसून पण असे आणावे लागायचे. तेंव्हा तर माझा थाट अगदी परदेशात शिकायला जाणारे तरुण असतात ना त्यांच्यासारखा होता. म्हणजे माझ्या गावापासून लांब शाळेसाठी आलो होतो. पप्पांनी मला योग्य शिक्षण मिळावे म्हणून दूर ठेवले होते. माझी दहावी झाली. बीड गावातल्या बऱ्याच मुलांना अगदी माझ्यापेक्षा चांगले मार्क्स पडले होते. मी पण खूप प्रयत्न केला होता. मलाही प्रथम श्रेणी पेक्षा कमी गुण नव्हते. मात्र तरीही प्रवेशासाठी माझी तारांबळ झाली होती. मला नगरच्या महाविद्यालयात पुढे अकरावीला प्रवेश घ्यावयाचा होता. दहावीला प्रथम श्रेणी मिळवली होती. मात्र त्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी फीस बरोबर डोनेशन पण द्यावे लागत होते. आणि ते डोनेशन म्हणजे काहीतरी बेकायदेशीर असते याची जरादेखील कल्पना माझ्या बालबुद्धीला नव्हती. मला विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायचा आहे इतकेच माहिती होता. पप्पांनी माझ्या विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी जरादेखील मनाई केली नव्हती. पप्पा न जादुगार होते. मला त्यातल काय समजणार, मी फक्त शेती कशी करायची या विचारातला. पण महाविद्यालयाची रक्कम आणि सोबत डोनेशनची रक्कम ऐकून पप्पांनी माझ्याकडे बघितले. माझ्या चेहऱ्यावर थोडा देखील समजण्याचा भाव नव्हता. फक्त इतकेच माहिती होते, चला माझा प्रवेश त्या मस्त महाविद्यालयात होतो आहे. पप्पांनी माझ्याकडे बघून एक हास्य केले आणि लगेचच बाहेर येऊन काही फोन फिरवले. आणि काय माझा प्रवेश झाला. डोनेशन आणि फीस दोन्ही सोय पप्पांनी केली. माझा आनंद गगनात मावत नव्हता. पण हा आनंद देणाऱ्या पप्पांना अजून पुढे किती कष्ट करावे लागणार आहेत याची मला त्यावेळी काहीच कल्पना नव्हती. म्हणूनच मी त्यांना जादुगार म्हणतो. 
बारावी झाल्यावर चला, मी अठरा वर्षात प्रवेश करणार होतो. आणि आता पुढचे शिक्षण काय तर मला अगदी पुण्यात जाऊ वाटत होते. पुण्यात आल्यावर आत्या देखील नव्हती. मग काय एक खोली बघायची जिथे विद्यार्थी राहत आहेत आणि पुण्यात आपले शिक्षण घायचे. आता पुण्यात आल्यावर पुण्यातले राहणे, खाणे, तिथला शिक्षण खर्च हे काही कमी खर्चिक नव्हते. पण पप्पा अजिबातच मागे सरत नव्हते. त्यांनी नुकताच एक टॅक्टर बँकेतून कर्ज काढून घेतला होता. त्याचे दरमहा हप्ते भरणे गरजेचे होते. आणि त्यातच मी एक नवीन माझ्या शिक्षणासाठी खर्चाचा प्रस्ताव पप्पांकडून मागणी केला होता. मी अगदीच शहराच्या ठिकाणी जाऊन पैसा वाया घालवेल, कुठला चुकून नाद लागून माझ्याकडून पैसा खर्च करेल इतका विश्वास पप्पांना माझ्यावर होता. आणि आत्याचे कडक संस्कार देखील माझ्यावर होते. त्यामुळे मी देखील पैसा वापरताना थोडे पाहून सावरूनच सगळ करीत होतो. शेवटी पुण्यात आलो आणि माझा प्रवेश झाला. गावाला पप्पा साधारण रोज फोन करून विचारायचे जेवण झाल का? कस आहे सगळ. मी पण त्यांना इकडच्या गमती - जमाती सांगायचो. 
मागच्या दोन वर्षी अजिबातच पाऊस झाला नाही. म्हणजे अगदी आमच्या गावातल्या गुरांना पण प्यायला - खायला काय द्यायचे याचे वांदे झाले होते. त्यामुळे शेताची अवस्था अगदीच बेकार झाली होती. त्यामुळे आमची म्हैस, बैलजोडी सर्व चाराछावणी मध्ये सरकारी आश्रयाला होते. घराची पण हालत तशी बेकारच होती. आम्हाला सर्वांना पैसा फार जपून वापरायचा होता. इकडे मी अभ्यास करून काही तरी करून दाखवायचे असे ठरवले होते. माझा अगदी महाविद्यालयात प्रथम क्रमांक आला होता. आणि मी पुन्हा गावाला उन्हाळी सुट्टीत आलो होतो. पप्पा सर्वाकडे माझी तारीफ करीत होते.माझा लेक पहिला आला हे सांगताना त्यांचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरुन झळकत होता. माझा अगदीच चारा छावणीमध्ये सत्कार देखील झाला. म्हणजे निकाल तर पहिल्याच वर्षाचा लागला होता. मात्र सर्व जण अगदीच मला काहीतरी खूप मोठे काम केले आहे आणि त्याबद्दल कौतुकाने बघत होते. माझा सत्कार मला फेटा घालून झाला. तो फेटा मला अगदी एखाद्या ताजपोषी सारखा वाटत होता. 
दुसऱ्या वर्षी प्रवेश घेतल्याने माझी नैतिक जवाबदारी अभ्यासाबाबत प्रचंड वाढली होती. त्यामुळे मी अजून मेहनतीने अभ्यास करू लागलो. शेवटच्या परीक्षेच्या आधी मार्च महिन्यात मामाच लग्न होत म्हणून मी गावाला आलो होतो आणि लग्न उरकून पुन्हा पुण्याला यायचे असा बेत होता. मात्र पुण्याला निघायच्या दिवशी महाविद्यालयातून फोन आला कोरानाच्या जागतिक पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे महाविद्यालयात येऊ नये. मी प्रचंड अभ्यास केला होता यावर्षी. मात्र परीक्षेची धाकधूक होती. परीक्षा होणार की नाही, आणि माझ्याकडे अभ्यासाला पण इकडे गावाला काहीच साधन नव्हते. त्यामुळे अगदीच अवघड परिस्थिती झाली होती. आणि पुण्याकडे जाणाऱ्या बससेवा देखील रद्द झाल्या होत्या. एकूणच मला वातावरण तेजाकडून तिमिराकडे जाणारे असे वाटत होते. मला पटकन मोठे व्हायचे होते. पटकन मोठे म्हणजे नोकरीसाठी लायक बनून पैसा कमवायचा होता. मात्र ही कोरोनाची परिस्थिती मला मागे खेचत होती. मी पण या सगळ्या गोष्टीवर मत करायचे ठरवले. घरी बसून काही करता येईल का बघितले. त्यासाठी मी मोफत कार्यशाळा, स्पर्धा आहेत का हे शोधू लागलो. निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा आहेत का हे मी मोबाईलवर शोधू लागलो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मला स्पर्धा इतक्या भेटल्या की अगदी माझ्या मित्रांनी देखील मला या स्पर्धेत भाग घे, त्या स्पर्धेत भाग घे असे सांगू लागले. काही स्पर्धांच्या पारितोषिकांवर माझे विशेष लक्ष होते. तसेच या स्पर्धा मोफत आहेत का हे देखील मी बघायचो. या स्पर्धांसाठी कधीही न वाचलेले राजकारण आणि पुरातन व्यक्तींना अभ्यासू लागलो. बाबासाहेब वाचले, राजकारणातले मोदि आणि पवारही वाचले. मी तर अगदी महाभारतातल्या अर्जुनासारखा पोपटाच्या डोळ्यावर म्हणजे या स्पर्धांचे पारितोषिक मूल्य यावर लक्ष ठेवून होतो. मी या बऱ्याच स्पर्धा जिंकल्या देखील. राज्यपातळी वर स्पर्धांमध्ये पहिला आलो. पप्पा खूप खुश व्हायचे. माझा नंबर आलेला बघून त्यांना खूप आनंद व्हायचा. पण दुसऱ्या बाजूला हा कोरोनाचा कहर थांबतच नव्हता. कॉलेज अगदी ६ - ७ महिने फक्त ऑनलाईन प्रकारे चालू होत. यावर्षी गावाला पाऊस भरपूर पडला. पण या भरपूर पावसाच्या नादात शेवटी राहिलेला कापूस डागाळला. पण दिवाळीच्या नंतर पप्पांनी वेगळा निर्णय घेतला. 
पप्पा झाले कोयता...




बीड मधल्या लोकांना कोयता होणे काय असते हे माहिती असते. पण बाकीच्या लोकांसाठी कोयता म्हणजे नक्की काय हे माहिती असणे गरजेचे आहे. गावाला ऊसतोडणी कामगारांना कोयता म्हणतात. कोयत्याने त्यांनी कापलेला ऊस पुढे साखरकारखान्यात पाठवला जातो. कोयत्याचे आयुष्य हलाखीचे म्हणायला काही हरकत नाही. जिथे ऊस कापायचा तिथे जावे लागते. आपल्या परिवारातील सदस्यांपासून दूर. किती दिवस माहिती नाही पण या गावावरून त्या गावाला हे कोयत्याचे आयुष्य. पप्पांनी कोयता होणाचा निर्णय घेताना आजीने, आईने सांगितले, "कशाला तुला सवय नाही ना". पण पप्पा टस की मस, ते अगदी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. गावातली काही जोडपी पण होती त्यांच्यासोबत. त्यामुळे जेवणाची सोय झालेली. पण राहणार कुठे, झोपणार कुठे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर काहीच मिळाले नव्हते. सोलापूरच्या एका साखरकारखान्यामध्ये ही मंडळी गेली होती. आमचा टॅक्टर पण पप्पांनी सोबत नेला होता. त्याच्यामुळे ते थोडे वरिष्ठ म्हणजे मुकादम असे होते. पण तितकीच जोखीम जास्त होते. पप्पा इतके दिवस शेतात राबायचे. पण रात्री घरी यायचे. आमच्यासोबत जेवायचे. पण आता त्यांना किती दिवस बघायला नाही भेटणार अशा सर्व गोष्टीनी डोके फिरले होते. त्यांची आवाराआवर सुरु झाली होती. काही अंथरूण पांगरून, काही खायचे पदार्थ, त्यांचे कपडे भरले गेले. मला कळत होते ते का चालले होते. ते मला थोडे मोठे कसे बनायचे याचे जणू प्रात्यक्षिकच देत होते. त्यांना माझी पदवी आता या वर्षी मिळाली की पुढे न थांबता शिकायचे आहे हे दिसू लागले होते. मग जेंव्हा फी भरायची वेळ येईल तेंव्हा कर्ज काढणे, दुसऱ्याकडे हात पसरणे यापेक्षा आपण स्वत: कष्ट करावे हे त्यांचे मत होते. भावाची पण नुकतीच दहावी झाली होती. तो लहानपणापासून आई वडिलांकडे होता. पण त्याचेही शिक्षण होणे गरजेचे होते. त्यामुळे आमच्या कुटुंबाचा सध्याचा आर्थिक एकमेव भार उचलण्यासाठी त्यांनी तो निर्णय घेतला होता. दुसऱ्या दिवशी आमचा टॅक्टर सोलापूरच्या दिशेने रवाना झाला. लांबपर्यंत टॅक्टर जाताना मी बघत होतो. 
नंतर पप्पांचा फोन आला की मी पोहोचलो. पण आता पप्पांचे तोंड बघू शकत नव्हतो. आणि इकडे एक नवीन परिस्थिती नकळत माझ्यावर आली होती. आजी आजोबा वयस्कर म्हणून तर भाऊ लहान म्हणून सर्व परिस्थिती मीच सांभाळावी असे माझे मन मला सांगू लागले. आई होती तशी, पण असतो न पुरुषी भाव म्हणून मला एकदमच मोठे झाल्यासारखे वाटले. शेतात कधीही काम न करणारा मी सकाळी ऑनलाइन पद्धतीने लेक्चर करायचो आणि लगेच शेतावर जायचो. तस सुरवातीला शेतात माझी अळम टळम होतीच. पण शिकतोय थोडे फार. पप्पांशी बोलणे होते रोज ते अगदी मजेत आहेत असे नेहमी सांगतात. 
मी इकडे वाचन चालू ठेवले होते. त्यामुळे बीडचे उसतोडणी कामगार यांचादेखील एक लेख समोर आला होता. सध्या या कामगारांचे पैसे वाढवून देण्याबाबतचे आंदोलन मला समजले. त्यांच्या व्यथा मग त्या आरोग्यविषयक असतील, त्या योग्य मोबदल्याबाबत असतील, इतर अडचणींबाबत असतील सर्व मी वाचून काढल्या. माझे डोके आणखीन चक्रावून गेले होते. कोयत्यांचे आयुष्य इतके खडतर आहे. आणि माझ्यासाठी पप्पा कोयता बनून गावाला गेले होते. पप्पांचे सध्याचे ठिकाण कोल्हापूर होते. सोलापूरच्या कारखान्यात गावातला ऊस पोहोचला म्हणून पप्पा कोल्हापूरला दुसऱ्या साखर कारखान्यात गेले होते. मध्ये ते घरी येऊन गेले नाहीत. घरी आले की परत त्यांचे पाय वळतील की नाही या भीतीने ते थेट सोलापूर ते कोल्हापूर गेले. मी त्यांना सहज विचारले पप्पा कोल्हापूरला तुमची झोपायची सवय कुठे आहे. मला असे वाटायचे की कारखान्यात, पण ते या प्रश्नाचे उत्तर द्यायला थोडी टाळाटाळ करत होते. तरीही माझ्या सारखे विचारण्याने त्यांनी उत्तर दिले की, "आपल्या टॅक्टरपाशी". हे एकून मी दोन मिनिट स्तब्ध झालो. टॅक्टरच्या जवळ म्हणजे अगदी उघड्यावर. थंडी जिथे ९ ते ११ अंश आहे तिथे पप्पा कडाक्याच्या थंडीत अगदी उघड्यावर झोपत आहेत. ज्या व्यक्तीने पुण्यात मी राहताना मला मखमालीची रजई आणून दिली होती तोच व्यक्ती माझा भविष्यकाळ सुधारण्यासाठी हाल अपेक्षा सहन करतो आहे. मी तुम्हाला का थांबवू शकलो नाही तिकडे जाताना. अजूनही दोन महिने तुम्ही तिकडेच आहात. 
माझ्यासाठी पप्पा तुम्ही कोयता झाले. मला तुमच्यासाठी तुमची छत्री व्हायची आहे. तुम्हाला ते सुख द्यायचे आहे ज्याचे तुम्ही हक्कदार आहात. तुमच्यावर कोणत्याही प्रकारची झळ मी पडू देणार नाही. पप्पा घरी या. मी तुमची वाट बघतोय. 

तुमचा लेक.    

Comments

Post a Comment